Loading...
bharatvn1947@gmail.com +91 7588011776 न्हावी, ता. यावल, जि. जळगाव, महाराष्ट्र
भारत विद्यालय लोगो

भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय

स्थापना : १९४७ | मान्यता : महाराष्ट्र शासन | संलग्न : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

बालवर्ग ते इयत्ता १२ वी (कला व विज्ञान) | मराठी व सेमी इंग्रजी माध्यम

27031506405
UDISE No.
Recognized by Government of Maharashtra
Recognized by
Govt. of Maharashtra
स्थापना
१९४७
९ जून १९४७
भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, न्हावी
About Us

भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, न्हावी

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भारत विद्यालयाचे ज्ञानदानाचे पवित्र कार्य ७९ वर्षापासून सुरु आहे. संस्था स्थापनेच्या कार्यात अग्रेसर असलेले कै. हरी सुपडू चौधरी व त्यांच्या तत्कालिन शिक्षणप्रेमी सहकारी कार्यकर्त्यांच्या त्यागमय कर्तृत्वाने हा अमृत महोत्सव साजरा करण्याचे सौभाग्य आम्हांस लाभत आहे. सन १९४७ ला आपला भारत देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा असतानाच सातपुड्याच्या, पायथ्याशी असलेल्या या छोट्याशा गावात शिक्षण प्रसारक मंडळाची मुहूर्तमेढ रोवली गेली व त्यातूनच ज्या विद्यालयाची उभारणी केली गेली त्यास 'भारत विद्यालय' नाव देण्यात आले. सर्वसमावेशक असे 'भारत' नाव विद्यालयास देण्यात तत्कालिन शिक्षणप्रेमी व देशप्रेमी बांधवांची केवढी ही महानता! केवढी ही दूरदृष्टी! देशाच्या अमृत महोत्सवा बरोबरच आपल्या संस्थेचा व विद्यालयाचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा अमृतयोग आम्हास प्राप्त झाला आहे. अमृत महोत्सव प्रसंगी सादर केलेला हा स्मृतिग्रंथ आपल्या पुढ्यात ठेवतांना मला अत्यानंद होत आहे.

आपल्या पूर्वजांनी संस्था उभारणी करीता उपसलेले अपार कष्ट, त्यासाठीची अफाट जिद्द व केलेल्या महान त्यागाचे फळ आजच्या व भावी पिढीच्या दृष्टीपटलावर साकार करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न ज्या गावकऱ्यांच्या अविश्रांत परिश्रमातून, ज्याच्या सांघिक शक्तीतून, कुशल नेतृत्वातून आजचे हे वैभव गगनभरारी घेतलेल्या वटवृक्षाचे स्वरुप संस्थेस व विद्यालयास प्राप्त झाले त्यांच्या पुण्यस्मृतीस आदराने अभिवादन करण्याच्या उदात्त हेतूने केलेली ही धडपड ! त्यादृष्टीने भूतकाळाचे सिंहावलोकन करून आलेल्या असंख्य अडचणींना सामोरे जात विकासाच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकण्यासाठीचा हा महोत्सव !

आजतागायत या विद्यालयातून बळकट पंख प्राप्त करून समाजरूपी क्षितीजावर यशस्वीपणे उत्तुंग भरारी घेत असलेल्या, समाजाचे व आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्यात मग्न असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांबद्दल, त्यांनी संपादन केलेल्या उज्ज्वल यशाबद्दल सार्थ अभिमान व्यक्त करता यावा म्हणूनही सादर केलेला हा 'अमृतयोग' !

त्यादृष्टीने गेल्या ७५ वर्षातील संस्थेच्या विकासाचा धावता आढावा, शालेय कामकाजाचे स्वरुप, संस्थेचे व विद्यालयाचे नेत्रदिपक यश या सर्वांच्या पाऊलखुणा प्रस्तुत स्मरणिकेत विखुरलेले आहेत 'अमृतयोग' ची ही कवाडे आपल्यासमोर यशस्वीपणे उघडी करण्यात अत्यंत मोलाचा वाटा आहे. तो देणगीदारांचा, जाहीरातदारांचा, आपले मनोगत लेखणीद्वारे व्यक्त करणाऱ्यांचा, माजी विद्यार्थ्यांचा, माजी व विद्यमान संस्थाचालकांचा, शिक्षकांचा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा, असंख्य गावकऱ्यांचा व अगणित स्नेह्यांचा, या सर्वांच्या प्रयत्नांना वेळेच्या आत मूर्तस्वरुप प्राप्त करुन देण्यास सहकार्याचा हात दिलाय तसेच स्मरणिका छपाईचे काम वेळेत करुन दिल्याबद्दल विजय ऑफसेटचे मालक श्री. विजयशेठ परदेशी व श्री. सुरेशशेठ परदेशी यांचीसुध्दा संस्था ऋणी राहील.

आज सकस शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. मात्र आमची संस्था गेल्या ७५ वर्षापासून ज्ञानदानाचा वसा जोपासणारी पंचक्रोशीतील नावाजलेली एकमेव संस्था आहे. आमच्या भाग्याने संस्थेच्या अमृतमहोत्सवाच्या सांगता समारोपाचे अध्यक्ष व "सांगता समारंभ फलक" ज्यांच्या शुभहस्ते होणार आहे, ते उच्च ध्येय ठेवून उंच झेप घेणारे जळगांव जिल्ह्याचे लाडके व उत्तम राजकारणी, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. गिरीश महाजन त्या सोबत आम्ही सादर करीत असलेल्या 'अमृतयोग' या स्मरणिकेचे प्रकाशन मा. खासदार श्री. उन्मेशदादा पाटील, (चाळीसगांव, लोकसभा) यांच्या शुभहस्ते होत आहे. मा. खासदार श्रीमती रक्षाताई खडसे (रावेर लोकसभा), मा. श्री. सुरेश भोळे (राजु मामा भोळे) (जळगांव शहराचे आमदार) इंडियन रेल्वे ट्रैफिक सर्व्हिसचे ऑफिसर श्री. अतुल राणे या सर्व थोरांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या आमच्या मातीतून स्फुर्ती घेवून भावी पिढी विकासाची गरुड झेप निश्चितच घेईल यात शंका नाही.भविष्यात नाविन्याचे किर्तीस्तंभ उभारण्यास या सर्वांचे, असंख्य मान्यवरांचे व आम्हाला न दिसणाऱ्यांचेही आशिर्वादात्मक हात सदैव आमच्या पाठीशी राहतीलच अशी सदिच्छा व्यक्त करुन हा 'अमृतयोग' आपणास सविनय अर्पण करीत आहे.